जळगाव येथील सुप्रसिद्ध श्री ओंकारेश्वर मंदिराची स्थापना विक्रम संवत २०२३ श्रावण शुद्ध १, बुधवार आंग्ल, दिनांक १७ ऑगस्ट १९६६ रोजी झाली. सदर देवस्थानचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी श्री ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट (रजि. नं. ए - ६२३, जळगाव) या नावाने संस्था स्थापन करण्यात आलेली असून विश्वस्त संस्थेमार्फत देवस्थानचे व्यवस्थापन पाहिले जाते. योगेश्वर भगवान श्रीकृष्णाच्या प्रेरणेने संस्थेचे पहिले विश्वस्त म्हणून महर्षी पाराशर (पारीक विप्र ) शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिनी शाखा कुलोत्पन्न कै. ओंकारदासजी बाळारामजी जोशी, जळगाव, महाराष्ट्र यांचे सुपुत्र सर्वश्री जयनारायण ओंकारदास जोशी, शिवराम ओंकारदास जोशी, मिश्रीलाल ओंकारदास जोशी, पन्नालाल ओंकारदास जोशी, मुरलीधर मोहनलाल जोशी व व्यवस्थापक म्हणून श्री. पुरुषोत्तम मिश्रीलाल जोशी यांनी संस्थेचे कामकाज पाहिले. दिनांक १७ ऑगस्ट १९६६ ला रजिस्टर्ड संस्था स्थापन झालेवर लगेच मंदिराचे सखोल नकाशे व इतर बाबी निश्चित करून व त्यांना सर्व स्तरावर मंजुरी मिळवून मंदिराच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली. जोशी कुटुंबियांतर्फे मंदिर व्यवस्थापनाला २८, ४५० चौरस फुट जागा जयनगर ह्या जळगावच्या उच्चभ्रू वस्तीत विनामूल्य भेट देण्यात आली. सन १९६७ ला मंदिराच्या भव्य अशा वास्तुचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. मंदिरासाठी जयपूर येथील सुप्रसिद्ध मूर्ती निर्माते मे. जैमिनी मूर्ती कलाकार यांच्यामार्फत पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडात शंकराची ५ फुट उंचीची ध्यानस्थ मूर्ती, आदिमाया पार्वती, गणपती, पिंडीची शाळुंखी, नंदी, चंडेश्वर अशा मूर्ती बनवून मागविण्यात आल्या. मंदिराची वास्तू पूजा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव विक्रम संवत २०२७, माघ शुद्ध १३, सोमवार आंग्ल दिनांक ८ फेब्रुवारी १९७१ रोजी अजमेर येथील सुप्रसिद्ध यज्ञाचार्य श्रीमान ब्रजमोहनजी व्यास यांच्या हस्ते सुसंपन्न करण्यात आली. आणि त्याचदिवशी सदर देवस्थान श्री कृष्णार्पण करण्यात येवून सर्व भाविकांसाठी देवदर्शनार्थ उपलब्ध करण्यात आले. आज त्याचा वटवृक्ष झालेला असून जळगावकरांचे तसेच महाराष्ट्रातील भाविकांचे सदरहू मंदिर आराध्य दैवत झालेले आहे.
संस्थेचे संस्थापक सदस्य श्री मिश्रीलाल ओंकारदास जोशी यांना सन १९६३ मध्ये पोटशूळचा आजार झाला होता. दोन-तीन महिनेपर्यंत आजार काही बरा झाला नाही. त्यामुळे आजारास कंटाळून त्यांनी आपल्या चारही बंधूंकडे संन्यास घेण्यात इच्छा प्रदर्शित केली. आणि ते त्यांच्या या निश्चयाशी दृढ राहिले. त्यांच्या भावांनी आणि गावातील त्यांचे प्रतिष्ठित व्यापारी मित्र मंडळींनी त्यांचे मन वळविण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. संन्यास घेण्याच्या ध्यासाने फक्त अंगावरील कपड्यानिशी, रेल्वेच्या फक्त जाण्याच्या तिकीटानिशी व सोबत कोणासही मदतनिस म्हणून न घेता ते काशीला निघून गेले. अशा वेळेस जोशी कुटुंबियांवर अनपेक्षित कोसळलेल्या संकटामुळे त्यावेळेस त्यांच्या भावांनी संकल्प केला की, आमच्या भावाचा पोटशूळचा आजार बरा झाल्यास व ते सुखरूप जळगावला परत आल्यास आम्ही शिव मंदिराची स्वखर्चाने स्थापना करू. काशी येथे गेल्यावर तेथे त्यांचे गुरुबंधू श्री. जामवंतसिंह यांना ते भेटले. श्री. जामवंतसिंह व श्री. मिश्रीलालजी यांनी सद्गुरु श्री गुळवणी महाराज यांचेकडून अनुग्रह घेतलेला होता. काशी येथे श्री. जामवंतसिंह यांनी संन्यास घेण्याबाबतची कारणे त्यांच्याकडून समजून घेतली व त्याबाबतीत त्यांच्याशी चर्चा करून त्यांची समजून घालून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला की, आपणास संन्यास घ्यावयाचा असल्यास त्यासाठी काशी येथे येवून राहण्याची आवश्यकता नाही. आपण घरी बसल्या संन्यासवृत्ती धारण करू शकता. त्यानुसार त्यांचे मन वळवून दोन-तीन महिने काशीला वास्तव्य केल्यानंतर तसेच मध्यंतराच्या कालावधीत त्यांचा पोटशूळचा आजार बरा झाला व ते जळगावला परत आले. जळगावला आल्यानंतर संपूर्ण जोशी परीवार अत्यंत आनंदीत झाला. आणि त्यांनी श्री. मिश्रीलालजी यांचे पोटशूळच्या आजारातून बरे होण्यासाठी केलेल्या संकल्पाची कल्पना त्यांना सांगितली. तसेच त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाने त्यांनी जळगाव येथे भव्य शिवालयाचे बांधकाम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी जळगाव येथील मेहरुण शिवारातील सर्व्हे नंबर ४३२+४९२+५६८ जिल्हा पेठ रोड, डी.एस.पी. चौक व कलेक्टर बंगला रोड लगत असलेल्या आपल्या १८ एकराच्या शेतामध्ये भूखंड पाडून त्यामध्ये मंदिरासाठी २८, ४५० चौरस फूट जागा शिवालयासाठी, जळगावात रजिस्टर्ड विश्वस्त संस्था निर्माण करून विनामूल्य जमीन संस्थेला दिली हाच भाग जयनगर नावाने ओळखला जातो. त्या जागेवर कोणत्याही स्वरुपाची कोणाहीकडून वर्गणी न घेता स्वखर्चाने मंदिराचे बांधकाम करून भव्य अशी वास्तू निर्मिती केली. सदर बांधकामाच्या वेळेस स्थानिक वास्तूशिल्प व स्थानिक कारागिरांची मदत घेण्यात आली होती. मंदिराचे बांधकाम ३,००० चौरस फुटात असून मंदिराचा गाभारा १५×१५ चौरस फुटाचा असून मंदिराचे शिखर हे ५१ फुट उंचीचे आहे. शिवालयाचे संपूर्ण बांधकाम परंपरागत भारतीय वास्तुशैलीत करण्याचा,मंदिरासाठी प्राचीन मापदंडानुसार बांधकाम करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तसेच सदर शिखराच्या बांधकामासाठी सोरटी सोमनाथ मंदिराचे वास्तूशिल्पकार पद्मश्री श्री. प्रभाशंकर ओघडभाई, सोमपूरा यांचे मार्गदर्शन घेण्यात आले होते आणि त्यांच्या सल्ल्यानुसार मंदिराच्या शिखराचे बांधकाम करण्यात आले व त्यांच्या सूचनेनुसारच मंदिरावर श्री चंडेश्वर यांची स्थापना करण्यात आली. श्री चंडेश्वर हे भगवान शंकराचे गण असून त्यांना शिवपिंडीचे अभिषिक्त जल प्राशनाचा प्रथम अधिकार प्राप्त असल्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यातून जळेरीद्वारा अभिषेकाचे जल हे बाहेर त्यांच्याद्वारे प्राशन केले जाते. आणि ते तेथेच त्यांच्या गुदेद्वारे भूमिगत होते. त्यामुळे शिव मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालतांना अभिषिक्त जल ओलांडून जाण्याचा दोष लागत नाही. म्हणून मंदिरावर ही पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते. भारतात अन्यत्र शिव मंदिरामध्ये अर्ध प्रदक्षिणा घालण्याचा प्रघात आहे. मात्र वरील वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्थेमुळे भाविकांना संपूर्ण प्रदक्षिणा घालता येते, ही व्यवस्था जळगावशिवाय अन्यत्र कोठेही आढळून येत नाही. मंदिराचे बांधकाम १९६७ साली पूर्ण झाले. त्यातील सर्व स्थापित मूर्त्या जयपूरहून जळगावला १९६८ साली आणण्यात आल्या होत्या, व मंदिराची प्राणप्रतिष्ठा १९७१ साली करण्यात आली. या चार वर्षांच्या काळात शिवलिंग, बाणस्वरुपाने प्राप्तीसाठी श्री. मिश्रीलालजी जोशी यांनी अविरत, अथक प्रयत्न केले. त्यांची प्रगाढ शिव भक्ती आणि शिव पूजनाभ्यास प्रचंड होता. शिवलिंग प्राप्तीसाठी ते सतत प्रयत्नशील होते व त्यासाठी त्यांनी नर्मदा प्रदक्षिणासुद्धा केली होती. नेहेमीच सदर काळात ओंकारेश्वरला जाणे शिवलिंग शोधण्याचा प्रयत्न करणे, नर्मदेच्या सहस्रधारा येथे जावून शिवलिंग शोधण्याचा प्रयत्न करणे, ओंकारेश्वरपासून २५ किलोमीटर पर्यंत असलेल्या धावडीकुंड येथे नर्मदेच्या पात्रातून नावेद्वारा जावून सोबत नावाड्यांना घेवून मध्यान्हच्यावेळी नर्मदेच्या डोहामध्ये नावाड्याद्वारे गोते लावून शिवलिंग शोधणे, महेश्वर येथे अहिल्याबाई होळकर यांची गादी असून तेथे त्यांच्या जीवनात त्यांनी संग्रहित केलेले असंख्य शिवलिंगचा भांडार आहे. तेथील विश्वस्तांना विनंती केली असता त्यांनी मंदिरासाठी एक शिवलिंग त्यातून देवू केले होते. परंतु त्यांचा शिवलिंगाचा भरपूर अभ्यास असल्यामुळे तेथील शिवलिंगामधून एकही शिवलिंग त्यांच्या मापदंडात बसले नाही. अशावेळेस त्यांनी निरुत्साही होवून श्री सद्गुरु गुळवणी महाराज पुणे यांना पत्र लिहिले की, मंदिराचे बांधकाम तयार असून मूर्त्या आलेल्या आहेत. परंतु स्वयंभू शिवलिंग प्राप्त झालेले नाही. ते प्राप्त होण्यासाठी आपण आमच्यासाठी ईश्वराजवळ प्रार्थना करावी अशी विनंती त्यांनी महाराजांना केली होती. तद्नंतर थोड्याच दिवसात श्री सद्गुरु गुळवणी महाराजांनी पोस्टाने श्री. मिश्रीलालजींना कळविले की, आपणास लवकरात लवकर शिवलिंग प्राप्त व्हावे अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. सदर पत्र प्राप्त झाल्यावर श्री. मिश्रीलालजी नेहेमीप्रमाणे शिवलिंग शोधण्यासाठी ओंकारेश्वर येथे गेले असता नर्मदा घाटावर एक अनोळखी व्यक्ती तेथे आली आणि त्या व्यक्तीने विचारले की, "आपणास शिवलिंग पाहिजे का ? पाहिजे असल्यास आपणास सुयोग्य जागा दाखवितो." "होय" सांगितल्यानंतर सदर व्यक्ती त्यांना शिवलिंग असलेल्याठिकाणी घेवून गेली व शिवलिंग मिळण्याचे ठिकाण दाखवून ती व्यक्ती निघून गेली. तेथे पाणबुड्यांनी प्रयत्न करून योग्य शिवलिंग बाहेर काढले. ते शिवलिंग पाहिल्यावर त्यांच्या सोबत असलेल्या सर्व जणांना त्यांनी ते दाखविले. शिवलिंगाचा आकार व रंग विचारला. प्रत्येकाचे त्याबाबतीत उत्तर वेगवेगळे आल्याने हे शिवलिंग स्थापित करण्यायोग्य आहे असा निर्वाळा त्यांनी दिला. ज्या व्यक्तीने त्यांना ते शिवलिंग दाखविले त्या व्यक्तीस त्याचा योग्य तो मोबदला द्यावा या हेतूने त्यांनी संपूर्ण ओंकारेश्वर परीसरात त्या व्यक्तीचा शोध घेतला असता व त्याच्याबाबतीत विचारपूस केल्यावर अशी व्यक्ती आम्ही पाहिली नाही व दिसलीही नाही असे उत्तर तेथे मिळाले. सदर शिवलिंग हे स्वयंभू असून घडविलेले नाही. त्याचा रंग मोरपंखी असून त्यावर स्वयंभू त्रिपूंड, स्वयंभू जानवे, स्वयंभू ॐ चिन्ह आहे. असे शिवलिंग प्राप्त झाल्यानंतर मंदिराची वास्तूपूजा आणि मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा व ८ दिवसांचा रूद्रयाग करून विक्रम संवत २०२७ माघ शुद्ध १३ सोमवार आंग्ल दिनांक ८ फेब्रुवारी १९७१ ला करण्यात येवून सदर देवस्थान श्रीकृष्णचरणी अर्पण करण्यात आले. मंदिरातील स्थापिक्त शिवशंकराची मूर्ती अत्यंत सुंदर, विलोभनीय व ध्यानस्थ अशी पद्मासनास्थ मूर्ती असून सर्व शिवभक्तांचे आकर्षणाचे केंद्र आहे. सदर मंदिरास सर्व जगत्गुरु श्री शंकराचार्य यांनी तसेच साधूसंतांनी भेटी दिलेल्या आहेत. श्री संत सद्गुरु नाना महाराज तराणेकर हे जेव्हा जेव्हा जळगावी यायचे तेव्हा तेव्हा मंदिरावर येवून शिव अभिषेक करावयाचे आणि ते नेहमी सांगत की, 'मला येथे साक्षात ईश्वराचे दर्शन होते.' येथे १२ ज्योतल साझाल विमान आहेत
दरवर्षी मंदिरावर दर्शनार्थ लाखो भाविक येतात. उत्तर भारतीय श्रावण मास व दक्षिण भारतीय श्रावण मास गुरुपौर्णिमा ते पिठोरी अमावस्या (पोळा) पर्यंत ४५ दिवसांचा कार्यक्रम मंदिरावर होतो. संपूर्ण श्रावण महिना व श्रावण सोमवारी मंदिरावर भाविकांची दर्शनार्थ प्रचंड गर्दी होते. संपूर्ण जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातून श्रावण मासात व महाशिवरात्रीला मंदिरावर दर्शनार्थ लाखो भाविक येतात. अशावेळी श्रावण सोमवार, आषाढी एकादशी महाशिवरात्री रोजी भाविकांना येण्या-जाण्यासाठी योग्य अशी रेलिंग लावून सुविधा करण्यात येते तसेच विशेष रोषणाई संस्थेतर्फे केली जाते. तसेच मंदिरावर विनामूल्य विशेष प्रसाद वाटप अखंड दिवसभर करण्यात येतो. श्रावण सोमवारी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी यात्रा ज्या दिवशी असते त्या दिवशी मंदिर परीसर अत्यंत खुलून गेलेला असतो. पुजेची सामानसामुग्री, पुजेचे साहित्य विक्रीची दुकाने, खेळण्याच्या सामानाची दुकाने, झोके, धार्मिक पुस्तकांची दुकाने मंदिर परीसरात थाटली जातात. मंदिरावर जन्माष्टमी, रामनवमी, दसरा, दिवाळी, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी इत्यादी उत्सव साजरे केले जातात. दर सोमवार व दैनंदिन दर्शनार्थ भाविकांची मंदिरावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. मंदिरातील परीसर अत्यंत स्वच्छ ठेवला जातो. तेथे असलेल्या पंचवटी, आमराई वृक्षामुळे मंदिराचे वातावरण अत्यंत आल्हाददायक होते. तेथे असलेल्या वृक्षराईमुळे मंदिर परीसरातील वातावरण हे गावातील वातावरणापेक्षा दोन अंशाने कमी असते. यामुळे कडक उन्हाळ्यात सायंकाळी व रात्री ११ वाजेपर्यंत भक्तगण तेथे विश्रांती तथा ध्यान धारणेसाठी येतात. मंदिर दैनंदिन सकाळी ५.३० ला उघडले जाते व रात्री ९ वाजता शयन आरती होवून मंदिराचे पट बंद केले जातात. मंदिर दुपारी १२ ते ४ या वेळेत दर्शनार्थ बंद असते. मंदिरावर त्रिकाल आरती केली जाते. प्रातः आरती सकाळी ७ वाजता, सायंकाळी ६ वाजता सायन आरती भाविकांच्या सामुदायिक प्रार्थनेसह केली जाते, रात्री ९ वाजता शयन आरती केली जाते. मंदिरावर संपूर्ण दिवसभर दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांना तीर्थ प्रसादाचे वितरण केले जाते. मंदिराचे पूजा अर्चाचे कामकाज तीन पुजाऱ्यांमार्फत केले जाते. तसेच मंदिरावर दैनंदिन अभिषेक पूजनाची सोय केली आहे. व त्यासाठी वेगवेगळी अभिषेक पूजनाची पावती पुस्तके ठेवलेली असून ज्या भाविकांना अभिषेक करावयाचा असेल त्यांनी पावती बनवून ईच्छित अभिषेक पूजन ते करू शकतात. भाविकांनी नवसाच्या पूर्ततेनिमित्त वेळोवेळी अर्पण केलेल्या लहान-मोठ्या नवसाच्या घंटांच्या बदल्यात त्यांचा नाद कायमस्वरुपी निनादत रहावा म्हणून मंदिरावर कायमस्वरुपी २२५ किलोची महाघंटा बसविण्यात आलेली आहे. संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पद्मालयानंतर एवढी मोठी घंटा फक्त ओंकारेश्वर मंदिरावरच आहे. संस्थेने वरील धार्मिक कार्यक्रमाबरोबरच लोकहिताचे बरेच उपक्रम सुरू केलेले आहेत. त्यामध्ये गरजू लोकांना संस्थेमार्फत वैद्यकीय व शैक्षणिक मदत केली जाते. कॅन्सर रूग्ण, हृदयविकारांचे रूग्ण यांना विशेष प्राधान्य देवून वैद्यकीय मदत संस्थेच्या नियमावलीनुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यावर केली जाते. लवकरच मंदिरातर्फे श्री ओंकारेश्वर देवस्थान हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेन्टर या नावाने संस्था उघडण्यात येणार असून त्या अंतर्गत परीपूर्ण अशा हॉस्पिटलची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी मंदिर परीसरातील जयनगर भागात ३५,००० चौरस फुट जागा संस्थेच्या नावाने जोशी परीवाराने कोणताही मोबदला न घेता संस्थेला दिली आहे. त्या जागेवर लवकरच सुसज्ज परीपूर्ण असे कॅन्सर व हार्ट हॉस्पिटलची उभारणी करण्यात येणार आहे. सदर उपक्रमास दहा कोटी रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे. मंदिराचा लवकरच नूतनीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार असून मंदिराचे सभामंडप व मंदिराबाहेरील परीसर अत्यंत सुशोभित करण्यात येणार आहे. सदर उपक्रमात १२०० चौरस फुटाचे ध्यान केंद्र बांधण्यात येईल जेणेकरून या धकधकीच्या जीवनात दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांचे अध्यात्मिक बळ वाढवून आत्मिक समाधान व त्यांना मनः शांती मिळेल. तसेच सिंहद्वाराची निर्मिती, भाविकांना शितल पाणी पिण्यासाठी सुसज्ज अशी पाणपोई, हात-पाय धुण्यासाठी पाण्याची सोय, जोडे - चप्पल स्टॅन्ड, भाविकांना बसण्यासाठी सुसज्ज असे आरामदायक बाक, भजन ऐकण्यासाठी श्रवणीय अशी स्पिकर व्यवस्था, कारंजे आणि बगीचा इत्यादी कामे आर्किटेक्टद्वारे लॅन्डस्केपिंग करून इ. कामांची सुरुवात लवकरच सुरु करण्यात येणार आहे. सदर कामास सुमारे २५ ते ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ते काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे, जेणेकरून मंदिराच्या वैभवात व जळगाव नगरीच्या सुशोभीकरणात भर पडेल. संस्थेमार्फत नेहेमीच गरजू लोकांना वैद्यकीय मदत, शैक्षणिक मदत दिली जाते. राष्ट्रीय आपत्ती असो (किल्लारीचा भूकंप, गुजरातचा भूकंप, त्सुनामी) संस्था आपल्यापरीने मदत करण्यास नेहमीच तत्पर असते. संस्थेचे विद्यमान विश्वस्त म्हणून सर्वश्री गजानन पन्नालाल जोशी, सीताराम जयनारायण जोशी, वसंत मुरलीधर जोशी, अनिल शांतीलाल जोशी, बाळकृष्ण पुरुषोत्तम जोशी कार्यरत आहेत तसेच मंदिर व्यवस्थापन श्री. समाविलास मोहनलाल जोशी हे पाहात आहेत. संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून श्री. गजानन पन्नालाल जोशी हे कार्यरत आहे.
विष्टकांत मुरलीधर
॥ शुभम् ॥